मेल्याची खात्री पटल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार
नांदेड। शहरात मागील काही वर्षांपासून गुंडगिरीचे सत्र चालूच आहे. त्यामुळे अनेकदा गोळीबार होण्याचे प्रकार घडले आहेत, परंतु यावर अंकुश लावण्यात पोलीस प्रशासन म्हणावे तेवढे यशस्वी होत नसल्याचे गोळीबाराच्या घटनेवरून बोलले जात आहे. काल दि.२० च्या रात्रीला पुन्हा शहरात गँगवार भडकला असून, एका गुंडाची डोक्यात गोळी घालून त्यानंतर तलवारीने सपासप वार करून खून करण्यात आला आहे. दोन दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी विक्की ठाकूर नामक गुंडाची हत्या केल्यानं शहरासह जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास नांदेड शहरातील गाडीपुरा भागात गॅंगवार मधून खुनाची घडली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मयत विक्की ठाकूर हा देखील गुंड प्रवृत्तीचा होता. त्यांच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात पाच गंभीर असे गुन्हे दाखल आहेत. विक्की ठाकूर काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटला होता. त्यानंतर काळ रात्रीला तो आपल्या घराजवळ थांबला असता अचानक काही गुंडानी हल्ला केल्याने खुनाची घटना घडली आहे.
मागील वर्षभरापूर्वी नांदेडमध्ये विक्की चव्हाण नावाच्या गुंडाचा देखील अशाच पद्धतीने खून करण्यात आला होता. कैलास बिगानिया नामक गुंडाने आपल्या अन्य साथीदारासह विक्की चव्हाणचा खून केला होता. विक्की ठाकूर हा विक्की चव्हाण याचा खास साथीदार होता. मंगळवारी रात्री विक्की ठाकूर गाडीपुरा भागात आपल्या घराजवळ थांबला असताना दोन दुचाकीवर आलेल्या पाच जणांनी त्याच्यावर अचानक गोळीबार केला. नेम चुकल्याने विक्की ठाकूर पळत सुटला. मात्र दुचाकीवरून आलेल्यानी त्याचा पाठलाग केला, विक्की ठाकुरवर तीन गोळ्या झाडल्या त्यापैकी एक गोळी मयत विक्कीच्या डोक्याला लागली.
आणि तो जागीच ठार होऊन धारतीर्थ पडला. त्यानंतर आरोपींनी हवेत गोळीबार करून दहशत पसरवली. हे टोळके एवढ्यावरच थांबले नाहीतर जमिनीवर पडलेल्या विक्की ठाकूरच्या शरीरावर तलवारीचे अनेक वार केले. विक्की ठाकूरचा खात्मा झाल्याची खात्री पटल्यानंतर आरोपी येथून पसार झाले. या घटनेनंतर शहरभर वेगवेगळ्या अफवा पसरल्या आहेत. परिसरात एकच दहशत पसरली असून, नागरिकांची धावपळ उडाली होती.
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. कुख्यात गुंड कैलास बिगनीया याचा भाऊ नितीन बिगानीया, गंगाधर बोकारे यांच्यासह अन्य गुंडांनी विक्की ठाकूर याची हत्या केली असा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत असून, शहरातील त्या भागात तणावपूर्ण शांतता आहे.
Post a Comment