हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगर (वाढोणा) शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. याचाच फायदा घेत काही भूमाफियांकडून होणार्या वस्तीवाढ करिता प्लॉट विक्रीचा धंदा तेजीत सुरू झाला आहे. सर्रास नियमाना बगल देऊन अकृषिक मान्यता नसणार्या जमिनीची प्लॉटिंग करून बोगस गावठाण प्रमाणपत्र जोडून मोठ्या प्रमाणावर दस्त नोंदणी होत असल्याची चर्चा सुरु आहे. या प्रकाराला नगरपंचायत आणि तहसील अधिकाऱ्याची मूक संमती असल्यामुळे हा सर्व गैरप्रकार केला जात असल्याने प्लॉट खरेदी करणार्यांना आगामी काळात मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार असल्याचे या प्रकारावरून दिसत आहे.
हिमायतनगर शहरातुन राष्ट्रीय महामार्ग गेल्यानंतर शहर व तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर नागरी वस्त्या वाढत आहेत. त्यासाठी रस्त्याच्या जवळपास असलेल्या शेतजमिनीला भाव आला असून, या जमिनी खरेदी करून मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंगचा व्यवसाय करणाऱ्यांची सांख्य वाढली आहे. परंतु प्लॉटिंग करिता कृषक जमीन अकृषिक करण्याची प्रक्रिया जटील असल्याने यासाठी संबंधित महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत करून सोपा मार्ग शोधण्यात आला आहे. गावठाण प्रमाणपत्र प्रकरण हे गंभीर स्वरूपाचे असून, सध्या तालुक्यात गावठाण प्रमाणपत्र देणारे रॅकेट सक्रीय झाले आहे.
ज्याच्या आधारावर गायरान, शासकीय, पांदण रस्ते, कृषीक जमिनीतील भूखंड, नाल्या, तलाव सर्वच गिळंकृत करून गावठाण प्रमाणपत्राच्या आधारे नोंदणीकृत विक्री करण्याचा सपाटा काही भुमापियानी लावला आहे. यामध्ये शासकीय यंत्रणा व भूमाफियामध्ये मोठे आर्थिक हितसंबंध होत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात दलाली होताना दिसत आहे. याचा भुर्दंड मात्र सर्वसामान्य नागरिक व शासनाला महसूल रूपाने सोसावा लागत आहे. गावठाण प्रमाणपत्राची सत्यता पडताळणे आवश्यक आहे मात्र अशी यंत्रणा हिमायतनगर शहरात सध्या उपलब्ध नाही. याचाच फायदा घेऊन प्लॉटिंगचा व्यवसाय करणार्यांनी साधिकाऱ्यांच्या संगणमताने हा धंदा सुरु आहे. त्यामुळे तहसील व दस्त नोंदणी परिसरात प्लॉटिंगचा धंदा करणाऱ्यांची संख्या ठाण मांडून बसत असल्याचे दिसून येत आहे.
नगरपंचायत ग्रामपंचायत क्षेत्रातील असलेल्या मूळ गावठाण व वस्ती वाढ मालकी जमिनीची नोंद पडताळणे आवश्यक आहे. तसेच एन ए झाल्यानंतर नियमानुसार शासकीय २ प्लॉट सोडणे बंधनकारक आहे, मात्र असे न करता थेट प्लॉट विक्री करून आपला स्वार्थ साधून घेतला जात आहे. हा आलबेल प्रकार सुरु असताना दस्त नोंद करणारे अधिकारी देखील याची पडताळणी न करता प्लॉट विक्री करणाऱ्यांकडून आपला स्वार्थ साधत नोंदणी करून देत असल्याने भूमाफिया चांगलेच फोफावले आहेत. हे सर्व गैरप्रकार लक्षात घेता अवैध व बोगस गावठाण यामुळे मोठ्या प्रमाणावर शासकीय जमिनी, इनामी जमिनी, निजामकालीन तलाव, पांदण रस्ते गिळंकृत करण्यात आले आहेत. हिमायतनगर शहर व तालुका परिसरात होत असलेल्या या प्रकाराकडे नूतन जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन सखोल चौकशी करून बेकायदेशीर कृत्य झाले असल्यास संबंधितांवर कारवाई करावी आणि यासाठी भूमाफियांनी सहकार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करून खरेदीदारांची होणारी फसवणूक टाळावी अशी मागणी होत आहे.
إرسال تعليق